-: आठल्ये घराण :-

 

इसवीसनाच्या ११ व्या शतकाचे सुमारास विद्यमान सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातून पाटणच्या दक्षिणेत १०/१२ मैलावर ओटोली या नावाचा जो गाव आहे तेथून आठल्ये घराण्याचे मूळ पुरुष देवळे येथे आले. हल्ली जसे पुणे-कर, कोल्हापूर-कर, रत्नागिरी-कर असे म्हटले जाते, तसे आपल्या पूर्वजांना ते ओटोलीहून येथे आल्यावर त्या भागातील पूर्वीचे लोक त्यांना ‘ ओटोली-ये’ म्हणजेच ओटोली गाववाले असे संबोधू लागले व तेच आपल्या कुलाचे आडनांव झाले. या ‘ ओटोली-ये’ या आडनांवाचा दिनांक १६७६ चे श्रीमत् छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्रात तीन वेळा उल्लेख आहे. त्यावरून किमान तीन शतकांहून जास्त काळ आपले हेच आडनाव कायम असून, कोकणातील आपले मूलस्थान कसबा देवळे हेच होय.

आपले देव-

आपल्या घराण्याच्या देवतांचा नाममंत्र खालीलप्रमाणे आहे.

१.       ॐ श्री महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती

२.       लक्ष्मी-पल्लीनाथ

३.       भवानी खड्गेश्वर

४.       श्री महाविष्णु प्रमुख पंचायत देवताभ्यो नम:ll

यातील ॐ श्री महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती या तीनही देवता कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीचे देवालयात (म्हणजेच अंबाबाईचे देवालयात) आहेत.आजवर आपण लघुरुद्र- महारुद्र- अतिरुद्र आदि प्रकारे श्री शंकराची विशेष उपासना आपल्या या उत्सवात अनेकदा केलेली आहे, तर चालू साली, शतचंडी रुपाने आपण या देवतांची विशेष उपासना केलेली आहे. श्री लक्ष्मी- पल्लीनाथ हा पाली येथे आहे व तो आपला कुलस्वामी आहे, तर श्री भवानी खड्गेश्वर हा देवळे येथे असून, तो आपला आराध्य दैवत आहे. कुलस्वामी व आराध्य दैवत यांतील फरक जाणून घेतला पाहिजे. आपल्यासारख्या अनेक कुलांचा जो स्वामी (संरक्षक) आहे, तो कुलस्वामी; आणि एखाद्या घराण्याच्या मूळ पुरुषाने, आपल्या आवडीप्रमाणे, विशेष आराधना करण्यासाठी जो देव निवडला त्याचा आराध्य दैवत होय. श्री महाविष्णु प्रमुख पंचायतनांत, प्रमुख स्थानी श्री विष्णू स्थापून शंकर, गणपती, रवी व देवी (ना- नारायण-शं-ग-र-दे) असे ‘विष्णू पंचायतन’ स्थापून पूजा करतात. श्रीमत् जगतगुरू आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्मातील निरनिराळ्या उपास्य देवतांचा समन्वय करून, एकीकरणाचा जो प्रयत्न केला, त्याकरिता ही ‘पंचायतन पूजा’ सुरु केली. आपले आठल्ये कुटुंब श्रीमत् शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत मानते, त्यामुळे ही पंचायतन पूजा आपल्याही कुलात रूढ झाली असावी असे मला वाटते.

 

मौजे शिपोशी तर्फे देवळे तालुका लांजा, जि. रत्नागिरी हा गाव आठल्ये यांस सुमारे २६५ वर्षांपूर्वी इनाम मिळाल्यावर त्यांनी आपला पूर्वीचा देवळे हा गाव सोडून शिपोशी येथे वसाहत केली. देवळे या गावी श्रीभवानी खड्गेश्वर या नावाचे पुरातन प्रसिद्ध स्वयंभू देवस्थान असून ते आठल्ये यांचे आराध्य दैवतआहे. ग्रामांतरामुळे सर्वांचा नित्य दर्शनाचा व पूजनाचा नियम अंतरु लागल्यामुळे, शिपोशी या गावी श्रीखड्गेश्वराची प्रतिमा म्हणून लिंगस्थापना करण्याचे ठरवण्यात आले. त्यामुळे नजीकच विशाळगडावर धनिक व सच्छील म्हणून प्रसिद्ध असलेले कै. हरिपंत केतकर हे विशाळगडावरून कोंडगावात जी ‘इभ्राहिमपूर’ नावाने पेठ वसावली तेथे रहाण्यास आले व तेथे त्यांनी आपले घरही बांधले. त्यांचे पश्चात् त्यांचे चिरंजीव कै. बापुजीपंत हे देवळे महालातील शिपोशी वगैरे गावातून सावकारीचा धंदा करीत असत, त्यांचेकडे शिपोशीचे इनामदार आठल्ये यांनी शिपोशी गावात श्रीशंकराची स्थापना करून मंदिर बांधून देण्याबद्दल विनंती करून, त्यांजकडून श्रीहरिहरेश्वर या नावाने बाणलिंगाची स्थापना करून लहानसे केंबळी मंदिर बांधून घेतले व आठल्ये इनामदार यांनी पूजाअर्चा वगैरेचा सर्व खर्च व इतर व्यवस्था आपण सुरु केली. ही गोष्ट इ.स. १७५० च्या सुमारास झाली असावी. यानंतर केतकर यांचे घर दग्ध झाल्यामुळे सर्व कागदपत्रे जळून गेले. त्यामुळे स्थापनेचा नक्की काल अद्यापि उपलब्ध झाला नाही. केतकर यांचे कुलदैवत श्रीहरिहरेश्वर व वडिलांचे नाव हरी, या दोन्ही दृष्टींनी श्रीहरिहरेश्वर असे नाव देण्यात औचित्य साधले असावे; कारण पूर्वीपासून जो शंकराचे देऊळ बांधतो त्याचे वा त्यांच्या इच्छेप्रमाणे अन्य नाव देऊन पुढे ईश्वर जोडण्याची प्रथा आहे. उदा. नीलकंठ + ईश्वर = नीलकंठेश्वर देवालय, साखरपे.

तथापि या देवस्थानाकडे आपला संबंध केतकर यांनी आजपर्यंत चालू ठेवला आहे. दरसाल चैत्र शु. प्रतिपदा रोजी श्रींचे देवालयात ते स्वतः किंवा त्यांच्यातर्फे कोणी मनुष्य येऊन ब्राह्मण मंडळीस निमंत्रण करून ‘वसंतपूजा’ करतात. श्रींचे देवालय नदीकाठी असून नजीकच कै. गंगाराम भास्कर आठल्ये, विजापूर यांनी उत्तम विहीर बांधून देवाला समर्पण केली आहे.

 

****************************************************